खामगाव, दि. २२ (प्रतिनिधी):
तालुक्यातील रामनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या मुद्यावरून निर्माण झालेला वाद अखेर गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि प्रशासनाच्या पुढाकाराने निवळला. शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने सर्वसंमतीने बसविण्यात आलेला पुतळा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असून पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
रामनगर येथील सार्वजनिक शासकीय जागेवर (सर्वे नं. १४८) पुतळा उभारण्याच्या प्रस्तावावरून दोन गटांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. पुतळा नेमक्या कोणत्या ठिकाणी बसवावा, यावरून वाद वाढत गेला आणि शनिवारी-रविवारी पहाटेपासून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
तहसील कार्यालयाच्या माध्यमातून दिवसभर दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. प्रशासनाने मध्यस्थीचे प्रयत्न केले; मात्र सुरुवातीला कोणतेही एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे परिस्थिती नाजूक बनली. तहसीलदार तथा दंडाधिकारी सुनील पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, शहर ठाणेदार रामकृष्ण पवार, ग्रामीण ठाणेदार किशोर तावडे, शिवाजीनगर ठाणेदार सुरेंद्र अहेरकर तसेच हिवरखेड व जलम येथील ठाणेदारांसह अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी तैनात होते.
दरम्यान, गावातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि दोन्ही गटांचे प्रतिनिधी यांच्या पुढाकाराने पुन्हा चर्चासत्र घेण्यात आले. प्रशासनाच्या मध्यस्थीने संवाद सुरू ठेवत शांततेचा मार्ग स्वीकारण्यात आला. चर्चेअंती बसविण्यात आलेला पुतळा काढण्यात आला. परिसरात लावण्यात आलेले पंचशील व निळे ध्वजही हटविण्यात आले.
Users Today : 47