नांदुरा, दि. २२ (प्रतिनिधी):
तालुक्यातील धानोरा खुर्द येथून १८ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
धानोरा खुर्द येथील रहिवासी गोपाल श्रीकृष्ण डाबेराव (वय ४४) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी तनुजा गोपाल डाबेराव (वय १८) ही २१ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता घरातून कुणालाही न सांगता निघून गेली. सुरुवातीला ती मैत्रिणीकडे गेली असावी, असा कुटुंबीयांचा अंदाज होता. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
वडील व नातेवाईकांनी गाव परिसर, नातेवाईक तसेच शक्य असलेल्या सर्व ठिकाणी शोध घेतला; परंतु तिचा कुठलाही सुगावा लागला नाही. अखेर २२ फेब्रुवारी रोजी वडील गोपाल डाबेराव यांनी नांदुरा पोलिसांत तक्रार दिली असून त्यानुसार मिसिंग नोंदविण्यात आली आहे.
तनुजाची उंची अंदाजे ५ फूट २ इंच, सडपातळ बांधा, निमगोरा रंग, लांबट चेहरा, काळे लांब केस व काळे डोळे अशी ओळख आहे. ती घरातून जाताना कथ्थ्या रंगाचा टॉप व लाल रंगाची लेंगी परिधान केलेली होती.
Users Today : 47