राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचा महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ मोठ्या संख्येने सहभागी व्हा : केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव

KHOZ MASTER
2 Min Read

शेगाव, दि. २२ (प्रतिनिधी): आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शेगाव येथे ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या भव्य मेळाव्याचा शुभारंभ २५ फेब्रुवारी रोजी द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार असून राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी २१ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे आढावा बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले.

मोफत आरोग्य सेवा व तपासणी

चार दिवसीय मेळाव्यात दररोज आरोग्य तपासणी व आवश्यक औषधींचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. यासाठी ६६ औषधी स्टॉल्स व ३५ हून अधिक आरोग्य तपासणी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. सर्व आयुष वैद्यकीय अधिकारी व फार्मासिस्ट यांनी उपस्थित राहून सेवा द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

२७ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच ‘वयोश्री’ व ‘एडीआयपी’ योजनेंतर्गत दिव्यांग व ६० वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी व साहित्य नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

विशेष प्रशिक्षण व कार्यशाळा

२६ फेब्रुवारी रोजी आशा वर्कर्ससाठी ‘आजीबाईचा बटवा’ या घरगुती आयुर्वेदिक उपचार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सुमारे २००० ते २५०० प्रगतशील शेतकऱ्यांसाठी वनौषधी लागवड, प्रक्रिया व विपणन विषयक कार्यशाळा होणार आहे. कृषी विभाग व ‘आत्मा’ यंत्रणेने यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.

देशभरातील नामांकित औषध कंपन्यांचा सहभाग राहणार असून शेतकरी उत्पादित वनौषधी मालाच्या खरेदीसंदर्भात करारही होणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘आयुष आहार’ या विषयावर प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *