शेंदुर्जन (प्रतिनिधी):
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती शेंदुर्जन येथे भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. ‘डीजे’सारख्या पाश्चात्य वाद्यांना फाटा देत मृदंग, टाळ आणि पावलीच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. महाराजांच्या प्रतिमेच्या दर्शनासाठी सुबक पंडाल उभारण्यात आला होता. सकाळी ७ वाजता ग्रामपंचायत व उत्सव समितीच्या वतीने विधिवत पूजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
संस्कार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांचा पेहराव परिधान करून पोवाडे सादर केले आणि महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर प्रकाश टाकला. किंडर गार्डन प्री-स्कूल तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थिनींनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ग्रामविकास अधिकारी प्रकाश आढाव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
भगवे फेटे परिधान केलेल्या महिलांनी फुगडी आणि लेझीम सादर करून मिरवणुकीची रंगत वाढवली. रात्री ११ वाजता मिरवणूक अत्यंत शांततेत व शिस्तीत विसर्जित करण्यात आली.
ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे, बीट जमादार रामदास वैराळ व पोहेकॉ राजेश गीते यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 47