बुलढाणा प्रतिनिधी :
जिल्ह्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून निर्माण झालेल्या वादात महिलांची छेडछाड व गंभीर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मनसेचे नेते अमोल रिंढे पाटील यांनी दोषींवर तात्काळ व कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“जिजाऊंच्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून महिलांची छेडछाड होते, त्यांना मारहाण केली जाते व शिवरायांचा द्वेष केला जातो, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
२० फेब्रुवारी रोजी पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावरून गावात वाद निर्माण झाला. या वेळी संजीवनी वाघ यांच्यासह पुतळ्याचे संरक्षण करणाऱ्या महिलांशी छेडछाड करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पुतळ्याची विटंबना झाल्याचाही आरोप पुढे आला आहे.
“माया-बहिणींची छेडछाड, मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा. गुन्हेगारांची गय केल्यास जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. अन्यथा मनसे तीव्र आंदोलन उभे करेल,” असा इशाराही अमोल रिंढे पाटील यांनी प्रशासनाला दिला.
प्रकरणातील सत्य परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी निष्पक्ष तपास व्हावा व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Users Today : 47