ग्राम रोजगार सहाय्यकांचा इशारा : मानधन न मिळाल्यास आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन

KHOZ MASTER
2 Min Read

मेहकर प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात येत असून तिच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये ग्राम रोजगार सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राम रोजगार सहाय्यक हे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांना मदत करत घरकुल, सिंचन विहिरी, फळबाग लागवड तसेच इतर रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये लाभार्थ्यांशी संपर्क ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत.
कमिशन पद्धतीवरून मानधनाची मागणी
रोजगार हमी योजनेवरील कामांसाठी ग्राम रोजगार सहाय्यकांना २.५, ४ व ६ टक्के कमिशन तत्त्वावर मानधन दिले जात होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेमार्फत त्यांना निश्चित मासिक मानधन देण्याची मागणी करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वी ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मासिक मानधन देण्याची मागणी केली होती.
त्यानंतर ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाने ग्राम रोजगार सेवकांना ८ हजार रुपये मासिक मानधन आणि २ हजार रुपये प्रोत्साहन व प्रवास भत्ता देण्याचा शासन निर्णय काढला. मात्र प्रत्यक्षात मानधन मिळाले नसल्याने रोजगार सहाय्यकांमध्ये नाराजी पसरली आहे.
आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनाचा इशारा
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात राज्यातील २८ हजार ग्राम रोजगार सहाय्यक आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत देशमुख, जिल्हा संघटक संजय मोरे, मेहकर तालुका अध्यक्ष परमानंद अवसरमोल, उपाध्यक्ष किशोर निकम तसेच रोजगार सेवक विष्णू आखरे आणि प्रविण ठोकळ यांनी ही माहिती दिली.
ग्राम रोजगार सहाय्यकांचे म्हणणे आहे की, शासनाने जाहीर केलेला निर्णय तातडीने अंमलात आणावा आणि थकित मानधन त्वरित द्यावे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *