शेगाव येथे ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६’ पूर्वतयारीची केंद्रीय मंत्र्यांकडून पाहणी

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव येथे विविध ठिकाणी भेट देत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीची सविस्तर पाहणी केली.
आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने येत्या २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६’ चे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी कार्यक्रमस्थळ, सुरक्षा व्यवस्था तसेच इतर तांत्रिक बाबींचा बारकाईने आढावा घेतला.
हेलिपॅड व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी
या भेटीदरम्यान श्री. जाधव यांनी राष्ट्रपतींच्या आगमनासाठी तयार करण्यात येत असलेले हेलिपॅड, कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आणि मुख्य कार्यक्रमस्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. आरोग्य मेळाव्यासाठी येणाऱ्या रुग्ण व नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था, विविध पॅथींचे स्टॉल्स, औषध वितरण केंद्र तसेच रुग्ण तपासणीसाठी उभारण्यात येणाऱ्या विशेष स्टॉल्सची तयारी त्यांनी तपासली.
मेळाव्यात येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये आणि तपासणी प्रक्रिया सुलभ व सुरळीत पार पडावी, यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यावेळी आमदार संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत केंद्रीय मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले असून, राष्ट्रपतींचा दौरा आणि राष्ट्रीय आरोग्य मेळावा अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *