पुतळा वादानंतर चिखला (काकड) येथे १०० हून अधिक ग्रामस्थांवर गुन्हे; निष्पक्ष चौकशीची मागणी

KHOZ MASTER
2 Min Read

दुसरबीड प्रतिनिधी :

मौजे चिखला (काकड), ता. लोणार, जि. बुलढाणा येथे २० फेब्रुवारी २०२६ रोजी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुमारे १०० ते ११० ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून निर्दोषांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वंजारी समाज बांधवांच्या वतीने बिबी पोलीस ठाणे येथील ठाणेदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना विनोद वाघ, डॉ. सुनील कायंदे, डॉ. गजानन घुले, सुनील केंद्रे, प्रभाकरराव ताठे, भगवानराव सानप, अॅड. शिवाजी सानप, हिम्मतराव सानप, संतोष रणमाळे, तुळशीराम करपे, नागेश घुगे, नामदेव मुळे, तानाजी खुळे यांच्यासह समाजातील शेकडो बांधव उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेसंदर्भात मतभेद निर्माण झाले होते. पुतळा उभारणीसाठी लोकवर्गणी संकलन सुरू होते; मात्र पुतळ्याचे स्थान निश्चित करण्याबाबत ग्रामस्थांमध्ये वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या. प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर गावातील सरपंच तसेच काही महिलांसह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. घटनेची संपूर्ण वस्तुस्थिती तपासून न पाहता कारवाई झाल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे.
या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करावी, संबंधित संवादांची चौकशी करावी तसेच संपूर्ण घटनेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गावात बाहेरील व्यक्तींच्या येण्या-जाण्यावर देखरेख ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.
पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असून सर्व बाजूंची माहिती घेतली जात असल्याचे समजते. तपासानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गावात शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

0 9 3 3 6 9
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *