सोयगाव प्रतिनिधी / गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील देव्हारी परिसरावर शोककळा पसरवणारी हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. मौती कार्यक्रमासाठी घरातून निघालेल्या २७ वर्षीय तरुणाचा अंबाशी फाटा येथे भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणाचे नाव राम सुरेश राठोड (वय २७, रा. देव्हारी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम राठोड हे देव्हारी येथून मांडवा येथे मौती कार्यक्रमासाठी दुचाकीने निघाले होते. दुपारी सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास अंबाशी फाटा येथे चिखली-मेहकर मार्गावर त्यांच्या हिरो स्प्लेंडर (क्र. एमएच २० एचएम १३२९) दुचाकीला टाटा इंडिका विस्टा (क्र. एमएच ३७ जी ४८३७) या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली.
धडक इतकी जबरदस्त होती की राम राठोड गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र वैद्यकीय तपासणीत त्यांना मृत घोषित करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस स्टेशन करीत आहेत.
राम राठोड हे मेहनती व मनमिळावू स्वभावाचे असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांच्या अकाली निधनामुळे देव्हारी गावात व परिसरात शोककळा पसरली असून अंत्यसंस्काराबाबत कुटुंबीयांकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, अंबाशी फाटा परिसरात वारंवार अपघात होत असल्याने येथे वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावरील वेगमर्यादा व संकेतचिन्हे याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Users Today : 9