मेहकर प्रतिनिधी :
शहरातील विकासकामांच्या श्रेयावरून राजकीय वातावरण तापले असून आमदार आणि माजी नगराध्यक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार देवाणघेवाण सुरू झाली आहे.
काल आमदार सिद्धार्थ खरात यांनी “नगराध्यक्षांच्या परवानगीशिवाय शहरात इकडचा खडाही तिकडे करू दिला जाणार नाही,” असे वक्तव्य केले होते. तसेच परवानगीशिवाय भूमिपूजन करणाऱ्यांवर आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाईचा इशाराही दिला होता.
या विधानाला उत्तर देताना माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली. “शहरात एक रुपयाचेही विकासकाम न आणणाऱ्या आमदारांनी आम्हाला उपदेशाचे डोस पाजू नयेत,” असा पलटवार त्यांनी केला.
गवळी म्हणाले की, सध्या शहरात सुरू असलेली बहुतांश कामे ही तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांनी मंजूर करून आणलेली आहेत. त्या कामांची पाहणी करून विद्यमान नगराध्यक्ष आणि त्यांचे नगरसेवक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नगरपालिकेतील सत्तासमीकरणाबाबत बोलताना गवळी यांनी सांगितले की, काँग्रेसचे ११ आणि शिवसेना शिंदे गटाचे ९ असे एकूण २० नगरसेवक नगराध्यक्षांच्या विरोधात आहेत. उपाध्यक्ष व सर्व सभापती आमच्या गटाचे आहेत. शासनाच्या नवीन आदेशानुसार नगराध्यक्षांना केवळ दरमहा बैठक बोलावण्याचा अधिकार असून धनादेशावर सही करण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“मी हस्तक्षेप करणार नाही असे सांगूनही आमदार रोज हस्तक्षेप करत आहेत. याचा अर्थ नगराध्यक्ष कमकुवत आहेत,” असा टोला गवळी यांनी लगावला. तसेच “विरोधातला आमदार” असल्याचे कारण देत विकासकामे न आणण्याचे रडगाणे बंद करावे आणि धमक असेल तर शहरासाठी कामे आणावीत, असे थेट आव्हानही त्यांनी दिले.
मार्चनंतर कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रभागांसाठी आणणार असल्याचा दावा करत गवळी यांनी पाणीपुरवठा प्रश्नावरही भाष्य केले. दहा–बारा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा उपाध्यक्ष आणि संबंधित सभापतींच्या प्रयत्नांतून आठवड्याभरावर आणला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पेनटाकळी प्रकल्पाच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीत असून लवकरच शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.
एकंदरीत मेहकर नगरपालिकेच्या राजकारणात सध्या चांगलाच कलगीतुरा रंगत असून आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Users Today : 9