सिंदखेड राजा प्रतिनिधी :
लोणार तालुक्यातील चिखला (ता. लोणार) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणातून एका महिला लोकप्रतिनिधीला मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
सदर महिला या शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ असून त्यांनी गावचे सरपंच व त्यांच्या समर्थकांनी पोलिसांसमोर आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच “माझं सगळं संपलं आहे, मी उद्या सकाळी ७ वाजता आत्महत्या करणार,” असे व्हॉट्सअॅप स्टेटस त्यांनी ठेवल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
पुतळा प्रकरणातून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अज्ञात व्यक्तींनी बसवला होता. त्यानंतर तो हटवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्याने संजीवनी वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत पुतळा हटवण्यास विरोध दर्शवला.
यावेळी गावातील काही महिला व पुरुषांनी त्यांना घेराव घालून मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. झटापटीदरम्यान त्यांच्या अंगावरील कपडे फाडल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे सांगितले जाते.
तणावपूर्ण वातावरण
या घटनेनंतर चिखला गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून सर्व बाजूंनी माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शिवसैनिक व शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
Users Today : 9