देऊळगावराजा प्रतिनिधी :
तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील सर्वे क्रमांक ८१ मध्ये मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या एका बीज प्रक्रिया केंद्राविरोधात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत. संबंधित केंद्रातून अॅसिडयुक्त प्रक्रिया केलेले पाणी थेट वनविभागाच्या हद्दीत सोडण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
वनक्षेत्र व भूजल धोक्यात?
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी कोणत्याही शुद्धीकरणाविना वनक्षेत्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे वनविभागाची जमीन नापीक व बंजर होण्याचा धोका निर्माण झाला असून, परिसरात चार ते पाच मोठे अॅसिड साठवण हौद तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. हे सर्व पर्यावरणीय नियमांचे पालन न करता उभारण्यात आल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी वनक्षेत्रालगत असल्याने जमिनीत साचलेले रासायनिक पाणी झिरपून भूजल दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दूषित पाण्यामुळे गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच वनक्षेत्रात मुक्त संचार करणाऱ्या वन्यजीवांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
या प्रकरणात वनविभागाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे पर्यावरण तज्ञांकडून माती व पाण्याची तपासणी करून सविस्तर अहवाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, वनपालांनी पंचनामा केला असून वनविभागाच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अॅसिड सोडण्यात आले नसल्याचे पंचनाम्यात नमूद केल्याची माहिती त्यांनी दिली.
या गंभीर आरोपांवर प्रशासन आणि वनविभाग पुढे काय कारवाई करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Users Today : 45