बीबी येथे ओबीसी एल्गार मेळावा; चिखला पुतळा प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

KHOZ MASTER
3 Min Read

लोणार प्रतिनिधी :

तालुक्यातील चिखला येथील महापुरुषाच्या पुतळ्यावरून कोणताही वाद झालेला नसून या प्रकरणाला जाणीवपूर्वक जातीय रंग दिला जात आहे, असा दावा वंजारी समाजातील नेत्यांनी बीबी येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात केला. जाती-जातींमध्ये निर्माण झालेली तेढ संपविण्यासाठी आम्ही येथे आलो असून हा वाद येथेच मिटवावा, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
२३ फेब्रुवारी रोजी बीबी येथे वंजारी समाजाच्या वतीने ओबीसी एल्गार मेळावा घेण्यात आला. मेळाव्यास बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिखला (काकड) येथे महापुरुषाच्या पुतळ्याच्या वादातून वंजारी समाजावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला.
संजीवनी वाघ यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा मराठा समाजाकडून करण्यात आलेला आरोप फेटाळून लावत, हा प्रकार राजकीय हेतूने रंगविण्यात आल्याचे वक्त्यांनी सांगितले. संबंधित घटनेचे व्हिडिओ व डीव्हीआर तपासून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
मेळाव्याच्या प्रारंभी Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार तोताराम कायंदे, माजी खासदार सुखदेव काळे, सुभाष दराडे, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सविता मुंडे तसेच भाजपचे प्रदेश प्रवक्ते Vinod Vagh यांच्या हस्ते करण्यात आले.
निष्पक्ष चौकशीची मागणी
सविता मुंडे यांनी गावाची बदनामी करण्यासाठी खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला. डॉ. सुनील कायंदे यांनी व्हिडिओ आणि आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. पुतळा सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय गावात झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
धनराज गुट्टे यांनी ठाणेदारांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली. प्रदीप नागरे यांनी विदर्भात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. सुखदेव काळे यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली.
‘जरांगेंनी सभा घेतल्यास समोरच मोठी सभा’
Manoj Jarange यांनी २५ फेब्रुवारीला सभा घेण्याचे जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर, जरांगेंनी सभा घेतल्यास त्याच्यासमोर मोठी सभा घेऊ, असा इशारा विनोद वाघ यांनी दिला. कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणावर लोक जमा करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘माणसं एकमेकांपासून तुटू नयेत’
जातीपातीचे वळण देऊ नका, महाराष्ट्रात दोन जातींचे भांडण लावू नका, सोशल मीडियावर अर्धवट माहिती पसरवू नका, असे आवाहन करत “आपण दोन समाजांतील वाद मिटवण्यासाठी आलो आहोत; माणसं एकमेकांपासून तुटू नयेत,” असे वाघ म्हणाले. मात्र महाराष्ट्रातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांना पकडल्याचा आरोप
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना पोलिसांनी काही अल्पवयीन मुलांना पकडून ठेवल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. संबंधित मुलांची परीक्षा बुडू नये, त्यांना तातडीने परीक्षेला हजर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
पुतळा हटविण्याला स्थानिकांचा विरोध नव्हता. महिलांमध्ये किरकोळ वाद झाला, मात्र कपडे फाडाफाडी झाली नसल्याचा दावा वक्त्यांनी केला. एकतर्फी गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी मेळाव्यात करण्यात आली.

0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *