चिखलीत वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

KHOZ MASTER
2 Min Read

चिखली प्रतिनिधी :

चिखली शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोडी, दुचाकी व चारचाकी वाहन चोरी तसेच नळावरील मोटार चोरीच्या घटनांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
शाहू नगर, चिखली येथे राहणारे श्री. तुळशीदास दत्तात्रय आकाळ यांच्या घरी नुकतीच चोरी झाल्याची घटना घडली. ही एकमेव घटना नसून शहरातील विविध भागांत अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनिल धंदर यांनी सांगितले. परिणामी नागरिक घराबाहेर पडतानाही साशंक झाले असून रात्रीच्या वेळी भीतीचे वातावरण जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर सजग नागरिक सुनिल धंदर पाटील यांनी नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. निवेदनात शहरातील प्रत्येक रहिवासी चौक आणि संवेदनशील ठिकाणी नगरपालिका मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व कॅमेऱ्यांवर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने अत्याधुनिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळेस पोलिस गस्त वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे. चोरीच्या घटनांमध्ये खासगी सीसीटीव्ही धारकांनी फुटेज देणे बंधनकारक राहावे, तसेच सीसीटीव्हीचा थेट प्रवेश पोलीस प्रशासनाकडे असावा यासाठी स्पष्ट नियमावली तयार करून जनजागृती करावी, अशी मागणी निवेदनात नमूद आहे.
सध्या अनेक ठिकाणी खासगी सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी चोरीनंतर फुटेज देण्यास काही जण टाळाटाळ करतात. “कॅमेरा बंद होता” किंवा “बिघाड झाला होता” अशी कारणे दिली जात असल्याने तपास प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, चिखली शहरातील चोऱ्यांचा वाढता आलेख लक्षात घेता प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागू शकतो, असा सूचक इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने तातडीने समन्वय साधून प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक बनले आहे

0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *