गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा : महसूल विभागाच्या सेवा नागरिकांना गावातच , सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी मंठा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरांचे’ आयोजन ७ मार्च ते १५ एप्रिल या दरम्यान करण्यात येणार आहे.
या शिबिरांमध्ये १५ पेक्षा अधिक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत प्रलंबित अर्ज व प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.
यामध्ये प्रमाणपत्रे, फेरफार, अकृषिक परवानग्या आदी कामांसाठी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, या उद्देशाने शहरात व गावपातळीवर शिबिरे घेतली जाणार आहेत. या शिबीरात तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहून अर्ज स्वीकृती , कागदपत्रांची तपासणी व तात्काळ कार्यवाही करणार आहेत. कागदपत्रे पूर्ण असल्यास त्याच दिवशी सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
ग्रामीण भागात कुठे, कधी शिबिरे ?
ग्रामीण भागातील ६ मंडळ स्तरावर ७ मार्च रोजी पांगरी गोसावी, १४ मार्च रोजी तळणी, १० एप्रिल रोजी ढोकसाळ तर १७ एप्रिल रोजी मालतोंडी व जयपूर येथे शिबिरे होणार आहेत.
शहरातील कधी शिबिरे ?
मंठा शहरात ८ मे रोजी व १५ मे रोजी नगर पंचायत मंठा येथे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
“नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करून प्रत्येक गावात सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,”
– सुमन मोरे , तहसीलदार मंठा
Users Today : 45