चिखली बंद : पुतळा वादातून महिलेवर मारहाणीच्या घटनेचा निषेध

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली प्रतिनिधी :

लोणार तालुक्यातील चिखला–काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा हलविण्याच्या वादातून एका महिलेला कथित मारहाण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २३ फेब्रुवारी) चिखली शहरात बंद पाळण्यात आला.
सकल मराठा समाज व शिवप्रेमी नागरिकांच्या आवाहनाला व्यापारी व व्यावसायिकांनी मोठा प्रतिसाद दिला. परिणामी शहरातील बहुतांश दुकाने दिवसभर बंद राहिली. सोमवारी भरत असलेला आठवडी बाजारही रद्द करण्यात आला.
शांततामय निषेध
सकाळपासून मुख्य बाजारपेठ, व्यापारी आस्थापने व कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. नागरिकांनी शांततेत बंद पाळत आपला निषेध नोंदविला.
चिखला–काकड येथे पुतळा हलविण्याच्या हालचालींवरून निर्माण झालेल्या वादानंतर संबंधित महिलेला मारहाण व विनयभंग झाल्याचे आरोप करण्यात आले होते. या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट पसरली.
परीक्षा सुरू असल्याने खबरदारी
दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. शाळा, स्कूल बस, रुग्णालये, मेडिकल व इतर जीवनावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या, तर इतर सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
कायदो-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसभर बंद शांततेत पार पडला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

0 9 4 7 9 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *