मालेगाव प्रतिनिधी :
जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया जिल्ह्यात वेगाने सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६३ ग्रामपंचायतींमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येत असून ग्रामीण राजकारणात हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांची धावपळही सुरू झाली आहे.
ही प्रक्रिया महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील २०२२ च्या सुधारित तरतुदीनुसार तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत आहे.
प्रभाग रचनेचे वेळापत्रक
२० फेब्रुवारीपर्यंत तहसीलदारांनी गुगल अर्थ नकाशाच्या आधारे गावनिहाय अद्ययावत नकाशे तयार केले.
२७ फेब्रुवारीपर्यंत तलाठी व ग्रामसेवक संयुक्त पाहणी करून प्रारूप प्रभाग रचना निश्चित करणार.
५ मार्चपर्यंत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून तपासणी पूर्ण.
११ मार्चपर्यंत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर.
१७ मार्चपर्यंत प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणे.
२३ मार्चपर्यंत आयोगाची मान्यता अपेक्षित.
३० मार्चपर्यंत सुधारित प्रारूप रचनेस अंतिम स्वरूप.
७ एप्रिलपर्यंत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविणे.
१३ एप्रिलपर्यंत हरकती स्वीकारल्या जातील.
२१ एप्रिलपर्यंत सुनावण्या पूर्ण.
२८ एप्रिलपर्यंत अंतिम प्रस्ताव आयोगाकडे सादर.
४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर.
तालुकानिहाय ग्रामपंचायती
वाशिम जिल्हा अंतर्गत प्रभाग रचना सुरू असलेल्या ग्रामपंचायती:
वाशिम – २४
रिसोड – ३४
कारंजा – २८
मंगरुळपीर – २५
मालेगाव – ३०
मानोरा – २२
आरक्षणाकडे लक्ष
प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होताच वार्डनिहाय आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. कोणता प्रभाग कोणासाठी राखीव राहणार, यावर अनेकांची राजकीय गणिते अवलंबून असल्याने गावोगावी चर्चांना उधाण आले आहे. पॅनलची जुळवाजुळव व उमेदवार निवडीवर स्थानिक प्रमुखांकडून भर दिला जात आहे.
निवडणुका पावसाळ्यापूर्वी की नंतर?
प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया आणि मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेळेत पूर्ण झाल्यास निवडणुका पावसाळ्यापूर्वी होऊ शकतात. अन्यथा या निवडणुका थेट पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, प्रत्यक्ष निवडणुका कधी जाहीर होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Users Today : 38