बुलढाणा प्रतिनिधी :
वाचन चळवळ कमी होत असल्याची खंत व्यक्त केली जात असताना बालकांसाठी साहित्यिक चळवळ उभी करणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीने ‘काव्यांकुर’ या उपक्रमातून बालकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत बाल साहित्यिक सुभाष किन्होळकर यांनी व्यक्त केले.
कविता सादरीकरणातून वैचारिक प्रगल्भता
कविता सादर करणे ही सोपी गोष्ट नसून योग्य उच्चार, भाव-भंगिमा आणि अंतर्मनातील विचारांचे प्रभावी प्रगटीकरण आवश्यक असते. लहान मुलांनी शेतीमाती, देशभक्ती, मातृभाषेची गोडी तसेच बहिणाबाईंच्या कवितांसारख्या विविध विषयांवर प्रभावी सादरीकरण करून वैचारिक प्रगल्भता दाखवली.
पालकांनी ‘काव्यांकुर’कडे स्पर्धा म्हणून न पाहता मुलांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी मिळालेली संधी म्हणून पाहावे, असे आवाहनही करण्यात आले.
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजन
वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या मराठी राजभाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर २२ फेब्रुवारी रोजी ५ ते १५ वयोगटातील बालकांसाठी ही कविता सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. वैशाली निकम व मृण्मयी निकम यांनी राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांच्या भूमिका साकारून संवाद सादर केला. प्रास्ताविक रविकिरण टाकळकर यांनी केले. व्यासपीठावर डॉ. गजेंद्र निकम व डॉ. वैशाली निकम उपस्थित होते.
स्पर्धेचे निकाल
🔹 लहान गट
शौर्य संदीप साठे – प्रथम
समर स्वप्निल पाटील – द्वितीय
रेवा निलेश सोनुने – तृतीय
अर्पित निषाद टाकळकर – उत्तेजनार्थ
अरित्री निखिल नलावडे – उत्तेजनार्थ
🔹 मोठा गट
सईशा स्वप्नील काळवाघे – प्रथम
संबोधी संदीप गवई – द्वितीय
रुजूला ओंकार गोडबोले – तृतीय
निर्गुण प्रशांत सदावर्ते – उत्तेजनार्थ
अन्वी अरुण गवारे – उत्तेजनार्थ
विजेत्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पालकांचा सहभाग महत्त्वाचा
पारितोषिक वितरण प्रसंगी वैशाली निकम यांनी सांगितले की, मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात. पालकांनी मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांच्या कलानुसार संधी उपलब्ध करून द्याव्यात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षितिज निकम व सई वानखेडे यांनी केले. पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
‘काव्यांकुर’सारखे उपक्रम बालकांमध्ये वाचन, साहित्य आणि संस्कारांची गोडी निर्माण करत असून, ग्रामीण भागातही साहित्य संस्कृतीची ज्योत तेवत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत.
Users Today : 38