संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ राज्यस्तरीय पुरस्कार

KHOZ MASTER
2 Min Read

संग्रामपूर प्रतिनिधी :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या प्रतिष्ठित संस्थेचा ‘वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला प्रदान करण्यात आला. २२ रोजी कर्जत (रायगड) येथे आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान देण्यात आला.
या यशामुळे संग्रामपूरसह बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सामाजिक प्रश्न, जनहिताचे मुद्दे आणि ग्रामीण भागातील समस्यांना सातत्याने वाचा फोडणारी समाजाभिमुख पत्रकारिता हे संग्रामपूर तालुक्याचे वैशिष्ट्य असल्याचे या पुरस्काराने अधोरेखित झाले.
पत्रकारांची मातृसंस्था
१९३९ पासून पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असलेली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था मानली जाते. दरवर्षी विशेष उल्लेखनीय कार्यासाठी ‘आदर्श’ पुरस्कार दिला जातो. यावर्षी अमरावती महसूल विभागातून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका पत्रकार संघ एकमेव मानकरी ठरला.
या सोहळ्यास मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, मावळचे खासदार शिरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकुर, आमदार महेंद्र थोरवे, राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष अभय आपटे, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष रणजीत राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मानाचे स्वरूप
राज्य पातळीवरील हा गौरव सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची संपूर्ण टीम उपस्थित होती. अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे, जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष अझहर अली, ज्येष्ठ मार्गदर्शक रामेश्वर गायकी, सचिव विवेक राऊत, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र धर्माधिकारी, उपाध्यक्ष शेख अब्दुल, कोषाध्यक्ष वासुदेव दामधर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सातपुड्यातील पत्रकारितेचा गौरव
संग्रामपूर हा आदिवासी बहुल व मागास तालुका म्हणून ओळखला जातो. तरीही राज्यातील ३५५ तालुक्यांमधून पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवत संग्रामपूरच्या पत्रकारितेने वेगळा संदेश दिला आहे. डिजिटल युगातही ग्रामीण पत्रकारितेने आपली विश्वासार्हता व सामाजिक बांधिलकी टिकवून ठेवली असल्याचे या पुरस्कारातून अधोरेखित झाले.
मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी सांगितले की, परिषदेच्या अकरा अध्यक्षांच्या भाषणांचा संग्रह लवकरच प्रकाशित होणार असून तो पत्रकारितेसाठी दीपस्तंभ ठरेल. “पुरस्कार म्हणजे जबाबदारी,” या जिल्हाध्यक्ष रणजीत राजपूत यांच्या सूचनेला संग्रामपूर पत्रकार संघाने सकारात्मक प्रतिसाद दिला.
या सन्मानामुळे संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारितेला नवी ऊर्जा व व्यापक दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

0 9 4 7 9 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *