मालेगाव प्रतिनिधी :
तालुक्यातील इरळा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भगवा ध्वज फडकावून प्रारंभ
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भगवा ध्वज ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर ग्रामपंचायत इरळा तसेच जिल्हा परिषद शाळा इरळा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी गावातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे व प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गावातील नागरिक, शिवजयंती उत्सव मंडळ, शिक्षक व ग्रामसेवक यांच्या हस्ते हे साहित्य वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सायंकाळी स्मारक परिसरात अभिवादन
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात गावकरी, महिला मंडळ, युवा मित्र परिवार तसेच लहान मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले. स्मारक परिसर आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता. भगवे झेंडे, रंगरंगोटी व रोषणाईमुळे परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते.
शिवजयंती यशस्वी करण्यासाठी गणेश जामकर, कृष्णा मते, आदित्य ठाकरे, अनिकेत सुरुशे, शंतनू ठाकरे, हर्ष कैथवास, उमेश ठाकरे, कृष्णा आंबेकर व अविनाश पंडित या युवकांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहात पार पडला.
गावकऱ्यांच्या एकजुटीतून साजरी झालेली ही शिवजयंती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
Users Today : 38