रिसोड, दि. २५ (प्रतिनिधी) –
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयामार्फत आयोजित राज्यस्तरीय ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ पुरस्कार वितरण समारंभात समता पुरुषोत्तम अग्रवाल मेमोरियल फाउंडेशनचा गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे विश्वस्त रवी अग्रवाल व रीचा अग्रवाल यांना प्रदान करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडलेल्या या समारंभात राज्यभरातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक उपक्रमांची दखल घेऊन फाउंडेशनची राज्यस्तरीय निवड समितीमार्फत निवड करण्यात आली होती.
पुरस्कार स्वीकारताना फाउंडेशनचे विश्वस्त रवी अग्रवाल यांनी हा सन्मान फाउंडेशन व सरकारी यंत्रणा यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याची भावना व्यक्त केली. या यशाबद्दल फाउंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल व संपूर्ण टीमचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
Users Today : 45