कारंजा, दि. २५ (प्रतिनिधी) –
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वाशीम यांच्या वतीने आयोजित ‘वऱ्हाडी जत्रा मिनी सरस प्रदर्शन २०२६’ या पाच दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन धाबेकर सांस्कृतिक सभागृह येथे कारंजा उपविभागीय अधिकारी तथा परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले तसेच राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, कारंजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पूनम राणे, विस्तार अधिकारी सचिन गटलेवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे, जिल्हा व्यवस्थापक प्रफुल्ल इटाळ, महिला व बाल विकास विभागाचे सुरज जाधव, जिल्हा व्यवस्थापक दत्ता चव्हाण व वर्षा ठाकरे आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना आकाश वर्मा म्हणाले की, ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांच्या उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल. महिलांनी आपल्या उत्पादनाचे प्रभावी मार्केटिंग करणे गरजेचे असून, आजच्या स्पर्धेच्या युगात डिजिटल मार्केटिंगकडे वळणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
८० वस्तू विक्री व २० खानावळीचे स्टॉल
२३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात सुमारे ८० वस्तू विक्रीचे स्टॉल तसेच २० खानावळीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सुमारे १०० स्वयंसहायता समूहांची उत्पादने येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खाद्यपदार्थ, मसाले, हातमागावरील कापड, ग्रामीण हस्तकला साहित्य आदी विविध वस्तूंसह खाद्यपदार्थांची मेजवानी या प्रदर्शनात लाभत आहे.
प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढाकार घेतल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर खुजे यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा परिषद शिक्षिका जया खंडागळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभियान व्यवस्थापक संदीप ढाले आदींनी परिश्रम घेतले.*
Users Today : 45