स्मार्ट मीटरमुळे वडगावातील २५ घरांचा वीजपुरवठा बंद

KHOZ MASTER
2 Min Read

वडगाव तेजन, दि. २५ (प्रतिनिधी)

येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कडून बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे गावातील सुमारे २० ते २५ घरांचा वीजपुरवठा बंद झाल्याची घटना समोर आली आहे. वेळेत वीज बिल न भरल्यामुळे ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महावितरकडून अलीकडेच गावात नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून, या मीटरद्वारे वीज वापराचे अचूक रीडिंग घेतले जात आहे. त्यानुसार ग्राहकांना वीज बिल देण्यात येते. मात्र, बिलाची अंतिम मुदत संपल्यानंतर स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा आपोआप खंडित होत असल्याने वेळेत बिल न भरलेल्या ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे.
गावातील सुमारे २० ते २५ घरांनी बिल वेळेत न भरल्यामुळे त्यांच्या घरातील वीजपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे सध्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात; मात्र वीज नसल्यामुळे त्यांना मेणबत्ती किंवा मोबाइलच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून डोळ्यांवर ताण येत असल्याची तक्रार पालकांनी व्यक्त केली आहे.
परीक्षेच्या काळातच वीजपुरवठा बंद झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी महावितरणने स्मार्ट मीटरबाबत अधिक जनजागृती करावी तसेच बिल भरण्याबाबत वेळेवर सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, महावितरणकडून सर्व वीज ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की, स्मार्ट मीटरमुळे वीज बिल अचूक दिले जात असून बिल दिलेल्या मुदतीत भरणे आवश्यक आहे. अन्यथा वीजपुरवठा आपोआप खंडित होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी वीज बिल वेळेत भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 9 4 6 3 1
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *