किनगाव राजा, दि. २५ (प्रतिनिधी) –
समृद्धी महामार्ग वर प्रवास करणाऱ्या परप्रांतीय ट्रक चालकाच्या भावावर अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला करून त्याला मरणासन्न अवस्थेत सोडल्याची धक्कादायक घटना नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३२२ येथे घडली. या घटनेमुळे परिसरात तसेच महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
समस्तीपूर (बिहार) येथील रहिवासी सबलू कुमार राय हा तरुण १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्ला लुटमारीच्या उद्देशाने होता की अन्य काही कारणांमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हल्लेखोरांनी त्याच्यावर अत्यंत निर्दयपणे मारहाण केली. डोक्यावर, पायावर तसेच गुप्तांगावर गंभीर वार करण्यात आल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सध्या संबंधित तरुण रुग्णालयात उपचाराधीन असून गेल्या सहा दिवसांपासून तो बेशुद्ध अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहे.
समृद्धीवर सुरक्षा प्रश्नचिन्ह?
महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिसांची गस्त असल्याचा दावा केला जात असताना अशी घटना कशी घडली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोपी हल्ला करून सहज पसार कसे झाले, याबाबतही चर्चा सुरू आहे.
घटनेनंतर २४ फेब्रुवारी रोजी फिर्यादी राजाराम राय (रा. बिहार) यांच्या तक्रारीवरून किनगाव राजा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गिते करीत आहेत.
Users Today : 45