लग्नसोहळ्यांतील दिखाव्याची परंपरा थांबणार कधी? मनोज पाटील

KHOZ MASTER
3 Min Read

मलकापूर, दि. २५
शहर असो की ग्रामीण भाग, आज सर्वत्र लग्नसमारंभ अधिक भपकेबाज होत चालल्याचे चित्र दिसत आहे. विवाहाच्या आमंत्रण पत्रिकेत “आपली उपस्थितीच आमच्यासाठी आशीर्वाद” असे आपुलकीचे शब्द असतात; पण प्रत्यक्ष सोहळ्यात मात्र काही मोजक्या श्रीमंत, प्रतिष्ठित किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांचेच नाव स्टेजवरून पुकारले जाते. त्यांना फेटा, हार, गुच्छ देऊन विशेष सन्मान केला जातो, तर इतर पाहुणे शांतपणे कोपऱ्यात बसून हा देखावा पाहत राहतात. ही परंपरा समाजाला नेमकी कुठे घेऊन जात आहे, याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.
लग्न हा केवळ दोन व्यक्तींचा करार नसतो; तो दोन कुटुंबांच्या भावविश्वाचा, संस्कारांचा आणि आशा-आकांक्षांचा संगम असतो. त्या मंगलक्षणी उपस्थित असलेला प्रत्येक पाहुणा प्रेमाने, आत्मीयतेने आणि शुभेच्छांनी आलेला असतो. कुणी शेतीची कामे बाजूला ठेवून येतो, कुणी रोजंदारी सोडून येतो, तर कुणी दूरवरून प्रवास करून सहभागी होतो. त्यांच्या मनात एकच भावना असते – “आपल्या लेकरांच्या आनंदात आपण सहभागी व्हावे.”
परंतु स्टेजवरील सत्काराच्या झगमगाटात अनेक चेहरे झाकोळले जातात. काही ठिकाणी लग्नसोहळे सामाजिक प्रतिष्ठेचे प्रदर्शन बनले आहेत. “कोण आला?”, “कोणाचा सत्कार झाला?”, “कोणाचा फेटा मोठा?” अशा प्रश्नांवरूनच सोहळ्याचे मूल्यमापन केले जाते. ही स्पर्धा केवळ खर्चाची नसून मानसिकतेची आहे. मान देण्याची परंपरा चांगली असली, तरी ती जर निवडक व्यक्तींपुरती मर्यादित राहिली, तर इतरांचा अवमान होण्याची शक्यता वाढते.
अनेक मान्यवर काही मिनिटांसाठी येतात, छायाचित्रे काढून घेतात आणि पुढे निघून जातात. पण संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून धावपळ करणारे, पाहुण्यांची विचारपूस करणारे, अडचणीच्या वेळी खांद्याला खांदा लावून उभे राहणारे मामा, काका, आत्या, मावश्या, मित्रपरिवार आणि समाजातील सामान्य बांधवच असतात. तरीही त्यांच्या नावाचा उल्लेख स्टेजवर होत नाही, हे वास्तव अंतर्मुख करणारे आहे.
फक्त दृष्टिकोन बदलण्याची गरज
सुरुवातीलाच सर्व पाहुण्यांचे सामूहिक स्वागत करणे, “आपण सर्व आमच्यासाठी समान आहात” हा संदेश स्पष्टपणे देणे, वेळेवर विधी पार पाडणे आणि प्रत्येकाशी मनापासून संवाद साधणे – या छोट्या कृतीतून मोठा संस्कार घडू शकतो. खरी प्रतिष्ठा भपक्यात नसते; ती वर्तनात असते. लग्नसोहळे दिखाव्याचे नव्हे, तर नात्यांच्या सन्मानाचे व्यासपीठ व्हावेत, ही काळाची गरज आहे.
समाजाने सजगपणे ठरवले, तर ही परंपरा नक्की बदलू शकते. श्रीमंती, पद किंवा राजकीय ओळख यावर मान मोजण्याची प्रवृत्ती थांबली, तर विवाहसोहळे खऱ्या अर्थाने आनंदसोहळे ठरतील. कारण शेवटी फोटोतील झगमगाटापेक्षा आयुष्यातील साथ अधिक मौल्यवान असते. “खऱ्या नात्यांना मान द्या, दिखाव्याला नाही” हा संदेश प्रत्येक कुटुंबाने आत्मसात केला, तरच लग्नसोहळ्यांना संस्कारांची आणि समतेची खरी उजळणी मिळेल.

0 9 4 7 8 2
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *