गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातील अधिकृत वाळू घाटांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय संपत्तीची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी केला असून संबंधित वाळू घाटांचे टेंडर तात्काळ रद्द करून कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, भुवन-१ व देवठाणा-उसवद-१ या अधिकृत वाळू घाटांवर शासनाच्या परवानगीचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने वाळू उपसा सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोकलेन व जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने नदी पात्रात खोलवर उत्खनन करून मोठमोठे खड्डे तयार केले जात असून नंतर त्याच यंत्रांच्या मदतीने खड्डे बुजवून परिसर सपाट केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे प्रत्यक्ष उत्खननाचे प्रमाण प्रशासनाच्या निदर्शनास येऊ नये यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने हा प्रकार केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून तपासणीपूर्वी परिसर लेव्हल केल्याने ईटीएस मोजणी व पंचनाम्यात वास्तव स्थिती लपवली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. नदी पात्राची नैसर्गिक रचना बदलणे, मुरूम टाकून रस्ते तयार करणे व पर्यावरणीय समतोल बिघडविणे हे शासन नियमांचे उल्लंघन असून त्यामुळे शासन महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच स्थानिक महसूल यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करून प्रत्यक्ष उत्खननाची ईटीएस मोजणी करावी, पोकलेन व जेसीबी वापराची चौकशी करून अटींचे उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधित वाळू घाटांचे टेंडर तात्काळ रद्द करावे व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश सोळंके यांनी केली आहे. दरम्यान, वाळू उपशामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून राष्ट्रीय संपत्तीची लूट थांबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही करण्यात येत आहे.
Users Today : 41