देऊळगाव राजा, दि. २५ (प्रतिनिधी) –
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ व्हावी, यासाठी पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला.
आगामी सण-उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम आणि वाढती गर्दी लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या मार्चमध्ये देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच क्यूआरटी पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा-कॉलेज परिसर तसेच संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भागांतून पोलिसांनी पायदळ फेरी मारली. शिस्तबद्ध संचलनामुळे काही काळ शहरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.
रूट मार्चदरम्यान पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी नागरिक, व्यापारी आणि युवकांशी संवाद साधला. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, सोशल मीडियावर बेजबाबदार संदेश प्रसारित करू नयेत, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांच्या सहकार्याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरात शांतता, सलोखा आणि बंधुता कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून कोणत्याही अनुचित प्रकारावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असून पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
Users Today : 41