बुलढाणा, दि. २५ (प्रतिनिधी) :
बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील सन २०२४-२०२५ मधील पोलीस शिपाई (चालक) पदाच्या १४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेला वेग आला असून २६ फेब्रुवारी २०२६ पासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. ही चाचणी Buldhana District Police मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानावर पार पडणार आहे.पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, १४ जागांसाठी एकूण ६ हजार ११३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. २६ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ५ वाजल्यापासून चाचणी घेतली जाणार आहे. होळी व धुलीवंदन सणानिमित्त १ मार्च ते ३ मार्चदरम्यान चाचणी बंद राहील.पहिल्या दिवशी ७०० उमेदवारांची, तर उर्वरित दिवसांमध्ये दररोज १२०० उमेदवारांची चाचणी होणार आहे. महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणी स्वतंत्र दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.उमेदवारांनी चाचणीसाठी येताना मूळ कागदपत्रांसह त्यांच्या छायांकित प्रतींचे दोन संच आणणे अनिवार्य आहे. सर्व प्रमाणपत्रे ०७/१२/२०२५ किंवा त्यापूर्वीची असावीत. मूळ अर्ज, प्रवेशपत्र, पाच पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पॅन कार्ड, सर्व शैक्षणिक गुणपत्रिका व प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.परगावाहून येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून पुरुष उमेदवारांसाठी सबसिडीयरी कॅन्टीन (पोलीस पोस्ट बुलढाणा ग्रामीणजवळ) तर महिला उमेदवारांसाठी स्व. दीपक जोग विश्रामगृह (स्टेट बँक चौकाजवळ) येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.उंची किंवा छातीच्या मोजमापाबाबत तक्रार असल्यास उमेदवारांना त्याच ठिकाणी अपिलीय अधिकाऱ्यांकडे दाद मागता येणार आहे. दैनंदिन चाचणीचा निकाल रोज संध्याकाळी पोलीस मुख्यालयातील सूचना फलकावर तसेच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
Users Today : 0