मुंबई
राज्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा अधिक जलद आणि सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत भूमी अभिलेख विभागात तब्बल ३२ नवीन कार्यालयांची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच महसूल विभागातील १०,६८३ पदांच्या सुधारित आकृतीबंधालाही शासनाने मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात गती येणार असून, जमीन नोंदणी, मोजणी, नकाशे व संबंधित सेवांमध्ये होणारा विलंब कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवीन मंजूर कार्यालयांमध्ये उपसंचालक भूमी अभिलेख यांचे १ कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची ८ कार्यालये तसेच नगर भूमापन अधिकारी यांची २३ कार्यालये स्थापन केली जाणार आहेत. या सर्व कार्यालयांची मुख्यालये आणि कार्यक्षेत्रे आधीच निश्चित करण्यात आली असून, लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.
महसूल विभागाच्या ११ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार हा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. यामुळे विभागीय पातळीवरील मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असून, तांत्रिक तसेच प्रशासकीय कामकाजात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना भूमी अभिलेखाशी संबंधित सेवा अधिक वेगाने मिळतील, तसेच कार्यालयीन कामकाजातील ताण कमी होऊन पारदर्शकता वाढेल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Users Today : 23