एपीके फाईल डाऊनलोड बँक खात्याची रक्कम लांब पास देऊळगाव राजा येथील शनिवारी पेठ परिसरातील रहिवासी शेतकरी सचिन विश्वास जपे (वय ४५ वर्षे) यांचा मोबाईल सायबर गुन्हेगारांनी हॅक केला होता. नंतर या ऑनलाइन फसवणुकीतून त्यांचे तब्बल दहा लाख ५१ हजार ६०२ रुपयांचे लुट केली होती. बुलढाणा सायबर पोलिसांनी या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात तातडीने तपास करून शेतकऱ्यांचे ८ लाख ५५ हजार ४७० रुपये परत मिळवून दिले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वात ही कामगिरी पार पडली.
एका अज्ञात सायबर गुन्हेगारांनी एका फाईलच्या माध्यमातून तक्रारदार शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये अनाधिकृत प्रवेश करून त्यांचा मोबाईल हॅक केला. नंतर त्यांच्या मोबाईलवर यूपीआय, एसएमएसची स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर वळती केली. त्यातून तक्रारदारांची बँक व्यवहारांची माहिती मिळवून २२ फेब्रुवारी २०२६ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध बँक खात्यांमधून एकूण १० लाख ५१ हजार ६०२ रुपयांची रक्कम ट्रान्सफर करून ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली होती. या प्रकरणी सचिन जने यांच्या तक्रारीवरून बुलढाणा सायबर पोलिसांत ७ एप्रिल २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये कलम ६६ (सी) (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात सायबर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पो.नि.संग्राम ,पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे, पोलीस अंमलदार रामु मुंडे, भारत जंगले, केशव घुबे, प्रशांत गवंडे आणि पंकज मेहेरे यांनी उपरोक्त गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांची पडताळणी आणि संबंधित बँकांचे नोडल अधिकाऱ्यांशी सातत्याने पत्रव्यवहार करून फसवणुकीतील ९ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम तात्काळ होल्ड केली. यादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील नोएडा येथील ॲक्सिस बँक शाखेतील नोडल अधिकारी यांच्या सहाय्याने ८ लाख ५५ हजार ४७० रुपये तक्रारदारांच्या बँक खात्यात यशस्वीरित्या परत जमा करण्यात आले. तर उर्वरित रक्कम परत मिळवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. संशयित आरोपींचा शोध घेण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, व्हाट्सअप ॲप, टेलिग्राम किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही फाईल्स डाउनलोड करू नयेत, कोणतीही ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले.
Users Today : 23