डोणगाव, दि. २६ (प्रतिनिधी)
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मेहकर निवडणूक विभागाने ही कारवाई केली असून संबंधितांना तीन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
देशभरात मतदार यादी शुद्धीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातही या मोहिमेला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत २००२ व २०२४ च्या मतदार याद्यांतील माहिती अॅपमध्ये अद्ययावत करून जुळवाजुळव करण्याचे काम बीएलओंना सोपविण्यात आले आहे.
२४३ बीएलओ, २४ पर्यवेक्षकांची नियुक्ती
मेहकर तालुक्यात या कामासाठी २४३ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी व निवडणूक विभाग आणि बीएलओ यांच्यात समन्वय साधण्यासाठी २४ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.
मात्र, दोन बीएलओंनी एसआयआर संदर्भातील कोणतेही काम सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले. तसेच १४ पर्यवेक्षकांनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे.
कायदेशीर तरतुदींचा इशारा
निवडणूक कर्तव्य पार पाडणे हे बंधनकारक असून, Representation of the People Act, 1951 मधील कलम ३२ नुसार निवडणुकीसंबंधी कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. कर्तव्यात कसूर केल्यास कलम १३४ नुसार दंडनीय कारवाई होऊ शकते, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे
एसआयआर कामात हलगर्जी; बीएलओ व पर्यवेक्षकांना नोटीस
0
9
4
6
2
8
Users Today : 42
Leave a comment