ट्रॅक्टरमधील मका उधळून सरकारचा निषेध हमीभावाच्या नावाखाली लूट; शेतकऱ्यांचा संताप उफाळला

KHOZ MASTER
2 Min Read

मलकापूर, दि. २६ (प्रतिनिधी)
हमीभाव जाहीर करूनही प्रत्यक्ष खरेदी केंद्रे सुरू न केल्याच्या निषेधार्थ मलकापूर येथे २६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष नीलेश नारखेडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय परिसरात ट्रॅक्टरमधील मका मूठ-मूठ भरून उधळत शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“हमीभाव जाहीर, पण खरेदी कुठे?”
आंदोलनादरम्यान नारखेडे यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, सरकारने प्रतिक्विंटल २४०० रुपये हमीभाव जाहीर केला असला तरी बाजारात व्यापारी १३०० ते १४०० रुपयांत मका खरेदी करत आहेत. म्हणजेच प्रतिक्विंटल सुमारे हजार रुपयांची लूट होत आहे.
तालुक्यातील हजारो क्विंटल मका शेतकऱ्यांच्या घरात साठून पडला असून कर्जफेड, बियाणे, खत आणि घरखर्चाच्या चिंतेत असलेला शेतकरी हमीभावाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र खरेदी केंद्रेच सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा व्यापाऱ्यांकडे वळावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“शेतकऱ्यांच्या घरातून मका बाहेर गेल्यावरच भाव वाढतात आणि मग खरेदी केंद्रे सुरू होतात. हा नेमका कोणाच्या फायद्याचा खेळ आहे?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
तहसील कार्यालयासमोर ठिय्या
तहसील आवारात मका भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला हिरव्या मक्याचे धांडे व कणसे बांधून, विविध फलक लावून शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. घोषणाबाजी करत आंदोलन तीव्र करण्यात आले.
आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार समाधान सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून समस्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. मात्र केवळ आश्वासनांवर विश्वास राहिलेला नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
आठ दिवसांचा इशारा
आठ दिवसांत मका खरेदी सुरू न झाल्यास तहसील कार्यालयावर धडक देऊन उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा नीलेश नारखेडे यांनी दिला. “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका,” असा स्पष्ट संदेश आंदोलनातून देण्यात आला.

0 9 4 6 2 7
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *