मायलेकांचा करुण अंत; तुरीच्या ज्वाळांत चिमुकल्याचा होरपळून मृत्यू हरणखेड येथील हृदयद्रावक घटना

KHOZ MASTER
2 Min Read

मलकापूर, दि. २६ (प्रतिनिधी)
नियतीने एका आनंदी कुटुंबावर क्षणात घाला घालत मायलेकांचे जिव्हाळ्याचे नाते कायमचे तोडले. बैलगाडीवरील तुरीच्या गंजीला लागलेल्या भीषण आगीत सात वर्षीय ओम संदीप होले याचा होरपळून मृत्यू झाला, तर लेकराच्या निधनाची बातमी समजताच आई वनिता संदीप होले (वय ३२) यांनीही असह्य धक्क्याने प्राण सोडला. २२ फेब्रुवारी रोजी हरणखेड येथे ही दुर्दैवी घटना घडली.
शेतकरी संदीप होले हे सकाळी शेतात गेले होते. दुपारी ओम वडिलांना घरी बोलविण्यासाठी शेतात आला. त्या वेळी तुरीच्या पेंढ्या बैलगाडीवर रचलेल्या होत्या आणि ओम निरागसपणे त्या गंजीवर बसला होता. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास परिसरात कचरा जाळला जात असताना वाऱ्याचा वेग वाढला. पेटत्या कचऱ्यातील ठिणगी उडून तुरीच्या पेंढ्यांवर पडली आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
कोरड्या पेंढ्यांनी चटकन पेट घेतल्याने आगीने बैलगाडीला वेढा घातला. मदतीसाठी आरडाओरड सुरू झाली. गावकऱ्यांनी धाव घेतली; मात्र आगीचा भडका मोठा असल्याने ओम गंभीररीत्या भाजला. त्याला तातडीने मलकापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढे जळगाव येथे हलविण्यात आले; परंतु उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आजाराने खंगलेल्या वनिता होले यांना जबर मानसिक धक्का बसला. लेकराच्या विरहाचे दुःख सहन न झाल्याने त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी व दुपारी मायलेकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेने हरणखेडसह परिसर सुन्न झाला आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात हळहळ दाटून आली आहे.
जाळपोळीच्या बेफिकिरीवर प्रश्न
शेतशिवारात कचरा जाळताना आवश्यक खबरदारी न घेतल्यास किती भीषण परिणाम होऊ शकतात, याची ही घटना जिवंत साक्ष ठरली आहे. क्षणिक दुर्लक्ष, वाऱ्याचा एक झोत आणि कोरड्या पिकाचा साठा—या सर्वांनी मिळून एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला.

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *