बुलढाणा, दि. २६ (प्रतिनिधी):
ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांचे संचालन व देखभाल आता ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ८ ते २२ मार्चदरम्यान देशभर ‘जल उत्सव’ साजरा केला जाणार असून, त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येक पात्र गावात ‘जल अर्पण दिवस’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी दिली.
ज्या गावांना ‘हर घर जल’ दर्जा प्राप्त झाला आहे आणि ज्या ठिकाणी योजना हस्तांतरित झाल्या आहेत, त्या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. योजना हस्तांतरणापूर्वी १५ ते ३० दिवस नळ पाणीपुरवठा योजनेची चाचणी, पाहणी व पडताळणी केली जाणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, पाणी गुणवत्तेची फिल्ड टेस्ट किटद्वारे तपासणी तसेच बँक खात्यासह कार्यान्वित पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अस्तित्वात असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रशिक्षित मनुष्यबळ—ऑपरेटर, ‘नल जल मित्र’—तसेच स्त्रोत शाश्वतता व सुरक्षितता आराखडा तयार करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती आणि संबंधित ऑपरेटर यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच योजना हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण हस्तांतरणाचे दस्तऐवजीकरण अनिवार्य राहील.
लोकसहभागासाठी ग्रामसभा, पीआरए उपक्रम, फिल्ड टेस्ट किटचे प्रात्यक्षिक, बचत गट सदस्य, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक व युवकांचा सहभाग घेतला जाणार आहे. विविध स्पर्धा, ‘मेरी पंचायत’ अॅप व पंचायत डॅशबोर्डचे प्रदर्शन, तसेच लोकप्रतिनिधींना निमंत्रण देऊन हा दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे.
‘जल अर्पण दिवस’चा मुख्य उद्देश पाण्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणे हा आहे. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, जल प्रतिज्ञा, जलपूजन व पाणी व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश सीईओ खरात यांनी दिले आहेत.
या उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन प्रकल्प संचालक जल जीवन मिशन सतीश देशमुख व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अनिल चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येत आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘जल अर्पण दिवस’ साजरा होणार सीईओ गुलाबराव खरात यांची माहिती : ग्रामीण पाणीपुरवठा योजना हस्तांतरणासाठी विशेष उपक्रम
0
9
4
6
2
0
Users Today : 34
Leave a comment