वडगाव तेजन, दि. २६ (प्रतिनिधी):
वडगाव तेजन परिसरात सध्या निलगाय (ब्ल्यू बुल) यांच्या कळपांचा प्रचंड उपद्रव वाढला असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी कळपाने येणाऱ्या निलगायी हरभरा, गहू, चणा, मका तसेच विविध भाजीपाला पिकांवर तुटून पडत आहेत. अनेक शेतांमध्ये पिके तुडवून टाकल्याचे दिसून येत असून काही ठिकाणी संपूर्ण शेत सपाट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कापणीच्या तोंडावर आलेली पिके काही तासांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बियाणे, खत, औषधे आणि मजुरीवरील खर्च वसूल होईल की नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
रात्री शेतात राखण करण्यासाठी शेतकऱ्यांना टॉर्च, काठ्या आणि फटाक्यांचा आधार घ्यावा लागत असूनही निलगायी पुन्हा शेतात घुसत आहेत. महिलांमध्ये व वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही पालकांनी संध्याकाळनंतर मुलांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे.
वनविभागाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी, निलगायींच्या वाढत्या संख्येवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी तसेच शेताभोवती मजबूत कुंपणासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
वडगाव तेजन परिसरात निलगायींचा धुमाकूळ; उभ्या पिकांचे लाखोंचे नुकसान
0
9
4
6
2
0
Users Today : 34
Leave a comment