लोकवर्गणीतून केला शाळेचा कायापालट घुस्सर जि.प. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम

KHOZ MASTER
1 Min Read

मोताळा, दि. २६ (प्रतिनिधी):
“आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचे ऋण फेडायचे” या भावनेतून तालुक्यातील घुस्सर बु. येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घुस्सर बु. च्या माजी विद्यार्थ्यांनी लोकवर्गणी जमा करून शाळेचा कायापालट केला आहे.
खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व टिकून राहावे व गोरगरीबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी एकत्र येत सर्व माजी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून ‘माझी शाळा, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली.
या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला. या निधीतून शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थ्यांसाठी हँडवॉश सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रंगमंच, परसबाग, वृक्षारोपण, जाळीचे कंपाऊंड, इमारत दुरुस्ती तसेच संपूर्ण रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे शाळेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे.
गावाला शाळेचा आणि शाळेला गावाचा आधार असावा, या विचारातून साकारलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही आदर्श ठरू शकतो. अशाच प्रकारे समाजाच्या सहभागातून जिल्हा परिषद शाळांना बळकटी मिळाल्यास खासगी शाळांप्रमाणेच जि.प. शाळांनाही पालक व विद्यार्थ्यांची प्रथम पसंती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *