बुलढाणा, दि. २६ (प्रतिनिधी):
कामगार कल्याण केंद्राच्या वतीने उद्या, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता इंटक सोसायटीच्या हॉलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचा समृद्ध वारसा, साहित्यिक परंपरा आणि सांस्कृतिक अभिमानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेसाठी दिलेल्या भरीव व अनमोल योगदानाचा गौरव व्हावा, या हेतूने कामगार कल्याण केंद्राने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या औचित्याने मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित व्हावे तसेच तिच्या संवर्धनासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी सर्जेराव चव्हाण हे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रशेखर केणे उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा. डॉ. संगीता पवार-काळणे, ज्येष्ठ होमिओतज्ज्ञ दुर्गासिंग जाधव उपस्थित राहणार असून व्याख्याते म्हणून उत्कृष्ट नाट्यलेखक शशिकांत इंगळे व नाट्यकलावंत गणेश राणे मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच अक्षरदेह नाट्यकला संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. शैलेश वारे, संतोष पाटील, विलास मानवतकर, सुरेखा इंगळे, रुचिरा पाटील व मृणाल सावळे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कामगार कल्याण केंद्राच्या वतीने विद्या शिंदे व नीलेश देशमुख यांनी केले आहे.
कामगार कल्याण केंद्रातर्फे आज मराठी भाषा गौरव दिन
0
9
4
6
2
0
Users Today : 34
Leave a comment