सिंदखेडराजा :
Manoj Kayande यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे Sindkhed Raja मतदारसंघातील देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या धोत्रानंदई वितरिका प्रकल्पाला लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील १४ गावांतील सुमारे १६७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कामासाठी सुमारे ५९ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच उर्वरित संबंधित कामांसह संपूर्ण प्रकल्पाचा निधी जवळपास अडीचशे कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याने तो मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. लवकरच या निधीला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास आमदार मनोज कायंदे यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पाअंतर्गत Khadakpurna Dam च्या डाव्या कालव्यातून पाणी सोडून परिसरातील शेतांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. अंढेरा, मेंडगाव, बायगाव, पाडळी शिंदे, धोत्रा नंदई, सुरा, नागणगाव, शिवनी आरमाळ, खैरव, वाघाळा, पोपळ शिवनी, हनवतखेड, ढोरवी आदी गावांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे.
सध्या या भागातील बहुतांश शेतकरी पावसावर अवलंबून शेती करतात. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. धोत्रानंदई वितरिका उभारल्यास कालव्याचे पाणी थेट शेतांपर्यंत पोहोचणार असल्याने खरीपसह रब्बी हंगामातही उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. तसेच भाजीपाला, फळबागा आणि इतर नगदी पिकांच्या लागवडीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगत बळीवंश चळवळीचे प्रवर्तक Nitin Kayande यांनी आमदार मनोज कायंदे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून स्थानिक शेतकरी व नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे
Users Today : 6