सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव मागील काही दिवसापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला आहे. मागील दोन वर्षात कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र कडक लाॅकडॉऊन असल्या कारणाने लग्न समारंभ, तसेच मंदिरे बंद करावी लागली होती,पण गेली काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्याने लग्न समारंभ, मंदिरे खुले झाल्याने त्यावर आधारित शेतीमालासह रोजगारही उपलब्ध झाल्याने व अनेक देवस्थानांची मंदिरे खुली झाल्याने यावर्षी काही प्रमाणात झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाने साथ दिल्याने त्यांची या वर्षीची दसरा -दिवाळी आनंदात साजरी होणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी आपल्या शेतीत दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करून चार पैसे मिळतील अशी पिके घेण्याचा प्रयत्न करत असतो तसेच पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून बघत असतो.सोयगाव तालुक्यात काही शेतकरी झेंडू शेतीकडे वळले आहेत. दसरा -दिवाळी सणाच्या उत्सवासाठी दरवर्षी जुलै महिन्यात झेंडू बेण्याची लागवड करतात. परंतु गेल्या काही वर्षात निसर्गाच्या अस्मानी सुलतानी संकटांमुळे दसरा -दिवाळी सणाच्या वेळेस पाऊस पडून झेंडूचे आतोनात नुसकान झाले तर काही शेतकऱ्यांची झेंडूची फुले हजारो रुपये गाडी भाडे करून बाहेर जिल्ह्यात बाजारात विक्रीसाठी नेली होती. मात्र एकही व्यापारी खरेदी करण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव झेंडूचे शेकडो किलो फुले रस्त्यावर फेकून दिली होती. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला होता. परंतु या वर्षी शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केल्यापासून पाऊस सुरू असून अशा वातावरणात शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन झेंडूचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना दसऱ्याच्या पहिल्या टप्प्यात चांगले पैसे मिळत असून दिवाळीच्या सणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ही चांगले उत्पादन मिळून चार पैसे मिळण्याची आशा आहे . सोयगाव तालुका सह परिसरातील सावळदबारा गावांमध्ये झेंडूचे उत्पादन चांगले निघणार असल्याने झेंडू खरेदी करणारे व्यापारी घरपोच येऊन झेंडू उत्पादक शेतकऱ्याकडून ८० ते १०० रुपये किलो भावाने झेंडूचे फुले खरेदी करून घेऊन जात आहेत त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची या वर्षीची दसरा -दिवाळी आनंदात साजरी होणार असल्याने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दसरा- दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखता प्रकाश व झेंडूच्या फुलांची सजावट शेतकऱ्याच्या पिवळ्या सोन्याचे भरभराटीचे दिवस, त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.मी वीस गुंठे क्षेत्रावर झेंडू फुलांची लागवड केली असून आतापर्यंत वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आला असून झेंडू पिकामध्ये आंतरपीक म्हणून कृषी विभागाकडून मिळालेल्या परसबाग भाजीपाला बियाण्याची लागवड केलेली आहे ,निसर्गाने व वातावरणाने साथ दिल्याने यावर्षी झेंडू उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा आहे. मागील एक-दोन वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे झेंडूची शेती धोक्यात आली होती. परंतु आता यावर्षी चांगला भाव मिळून दसरा दिवाळी गोड होईल असं दिसून येत आहे.
माजी सरपंच दारासिंग चव्हाण
झेंडू उत्पादक शेतकरी
नादातांडा ता.सोयगाव