जानेफळ
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाची शासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने जानेफळ येथील गजानन बोरकर यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. या घटनेमुळे गेल्या दोन दिवसांपासून पोलीस व महसूल प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप करत समाजामध्ये पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. या पार्श्वभूमीवर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी १६ मार्चपासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने २४ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास गजानन बोरकर यांनी जानेफळ येथे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. त्यांनी सोबत गादी नेऊन टॉवरवरच ठाण मांडले आहे.
ही माहिती मिळताच जानेफळचे ठाणेदार तसेच मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके यांच्यासह पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी बोरकर यांना खाली उतरवण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत खाली उतरणार नाही, असा ठाम पवित्रा बोरकर यांनी घेतला आहे.
दरम्यान, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजबांधवांनी टॉवरखाली साखळी उपोषण सुरू केले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
Users Today : 11