चिखली –
सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबतच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असताना काही पेट्रोलपंप चालकांनी नियम धाब्यावर बसवल्याचे प्रकार समोर येत आहेत. चिखली येथील रेणुका पेट्रोल पंप येथे चक्क २०० लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत डिझेल भरून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उघड उल्लंघन झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे वाहनधारकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतानाही अनेक जण २५ ते ३० लीटर क्षमतेच्या कॅन घेऊन उभे राहून मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, इंधन टंचाईच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी २६ मार्च २०२६ रोजी आदेश काढून कॅन, बाटल्या किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास सक्त मनाई केली होती. मात्र चिखली तालुक्यातील काही पेट्रोलपंपांवर या आदेशाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, एका चारचाकी वाहनामध्ये पाणी साठवण्यासाठी वापरली जाणारी दोनशे लीटरची टाकी ठेवून त्यात थेट डिझेल भरून देण्यात आले. पेट्रोलपंपावरील पाइप टाकीपर्यंत लांबवून सर्रास इंधन भरण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
याशिवाय कॅन आणि प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल भरून घेतल्याचेही निदर्शनास आले. ही साठेबाजी स्वतःच्या वापरासाठी नसून भविष्यात कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या दराने विक्री करण्यासाठी असल्याचीही चर्चा परिसरात रंगली आहे.
दरम्यान, ज्वालाग्राही पदार्थाची अशा प्रकारे असुरक्षित साठवणूक केल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडून तातडीची कारवाई न झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
आता या नियमबाह्य इंधन विक्रीप्रकरणी प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Users Today : 25