साखरखेर्डा :
साखरखेर्डा परिसरात जंगली प्राण्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरखेर्डा, सावंगी भगत आणि गोरेगाव शिवारात अस्वलाचा मुक्तसंचार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा गावापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोराडी जलाशय परिसरात विविध जंगली प्राण्यांची संख्या वाढली आहे. तसेच पिंपळगाव सोनारा, शिंदी, राताळी, मोहाडी, सवडद, गुंज, वरोडी, सावंगी भगत, सावंगी माळी आणि दरेगाव या भागातील तलाव परिसरातही रानडुक्कर, नीलगाय आणि हरीण यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे शेतकरी सांगतात.
या जंगली प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांना दिवसरात्र शेतात राखण करावी लागत आहे. याचदरम्यान या प्राण्यांची शिकार करण्यासाठी बिबट्यांचाही वावर वाढल्याचे सांगितले जात आहे. मोहाडी शिवारात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतीची कामे करावी लागत आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून साखरखेर्डा, सावंगी भगत आणि गोरेगाव शिवारात अस्वल दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक शेतकरी सुधीरआप्पा बेंदाडे यांच्या सावंगी भगत येथील शेत परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून अस्वलाचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी महिला मजूर जाण्यास धजावत नसल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
या संदर्भात मेहकर वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संबंधित अधिकारी फोन उचलत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे वन विभागाने तात्काळ या अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार मनोज कायंदे यांच्याकडे केली असून वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे
Users Today : 25