बुलढाणा :
रामनामाची शक्ती अफाट असून कलियुगातून तारण्यासाठी नामस्मरण हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या त्रयोदशाक्षरी मंत्राचे नामस्मरण आणि अन्नदान अट्टाहासाने करावे, असे मौलिक मार्गदर्शन समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज यांनी केले.
रामनवमी निमित्त श्रीक्षेत्र माकोडी येथे आयोजित ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड नामस्मरण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
श्रीहरी महाराज पुढे म्हणाले की, ईश्वराचा अवतार हा दुष्टांचा नाश करण्यासाठी असतो. मात्र संत व सद्गुरू मार्ग चुकलेल्या लोकांनाही योग्य मार्ग दाखवतात. भगवंताची मनापासून सेवा केल्याने नामाची गोडी लागते आणि जीवनाचे खरे मर्म समजते. त्यामुळे प्रत्येकाने दररोज थोडा का होईना रामनामाचा जप करावा.
रामनवमी निमित्त धामणगाव बढेसह परिसरातील भाविकांच्या दिंड्या श्रीक्षेत्र माकोडी येथे दाखल झाल्या होत्या. यावेळी रामजन्म सोहळ्याच्या कीर्तनात हभप ज्ञानेश्वरी माऊली निरपुकर यांनी सद्गुरूंच्या महिम्याचे वर्णन केले. नामस्मरणातच मनुष्य जीवनाचे खरे हित असून ईश्वरप्राप्तीसाठी सद्गुरूंची कृपा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रामनवमी निमित्त २६ मार्च रोजी सकाळी काकडा आरती, अभिषेक व विधिवत पूजा-अर्चा पार पडली. त्यानंतर आकर्षक सजविलेल्या रामरथासह श्रीहरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवे झेंडे, टाळ-मृदंगाचा गजर आणि रामनामाच्या जयघोषात भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. महिला-पुरुष भाविकांनी फुगड्यांचे फेर धरत आनंदोत्सव साजरा केला.
प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने माकोडी परिसर दुमदुमून गेला होता. शोभायात्रेच्या स्वागतासाठी परिक्रमा मार्गावर सडासमार्जन करून आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. दुपारी रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. २७ मार्च रोजी गोपाळकाला कीर्तन, नैवेद्य आरती व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली
Users Today : 28