बुलढाणा :
बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथील सुपुत्र तथा हिरकणी महिला अर्बनचे सल्लागार विकास उर्फ तात्या मल्लिकार्जुन आप्पा क्यावल यांनी १०१ दिवसांची खडतर पायी नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. सुमारे ३६०० किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी ‘नर्मदे हर’च्या जयघोषात पूर्ण करत आध्यात्मिक ध्यास आणि जिद्दीचा अनोखा आदर्श घालून दिला आहे.
वयाच्या साठीनंतरही एवढ्या मोठ्या अंतराची पायी परिक्रमा पूर्ण करणे हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. हा प्रवास केवळ धार्मिक विधी नसून मानवी इच्छाशक्ती, श्रद्धा आणि चिकाटीचे प्रतीक असल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत आहे.
तात्या क्यावल यांनी ५ डिसेंबर रोजी बुलढाण्यातून या पवित्र प्रवासाला सुरुवात केली होती. नर्मदा परिक्रमा दरवर्षी अनेक भाविक करत असतात. या प्रवासादरम्यान मार्गातील भक्तांकडून परिक्रमावासीयांसाठी चहा, पाणी आणि भोजनाची व्यवस्था उत्साहाने केली जाते.
नुकताच हा संकल्प पूर्ण करून तात्या क्यावल यांचे बुलढाणा शहरात आगमन झाले. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करत नर्मदा जल अर्पण केले. शहरातील गजानन महाराज मंदिर ते नक्षत्र रेसिडेन्सीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यानंतर वरवंड येथे कामेश्वर महादेव मंदिर येथे नर्मदा जल अर्पण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या प्रसंगी ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तात्या क्यावल यांच्या या परिक्रमेने परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले
Users Today : 25