मोताळा –
तालुक्यातील परडा येथील चेतना विकास प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक व अभिनव उपक्रम राबवत पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. तसेच शुभम उबाळे यांनी “चला पक्षांना पाणी पाजूया” ही संकल्पना मांडली.
माणसाच्या सर्वात जवळचा व लहान मुलांचा आवडता पक्षी म्हणून ओळखली जाणारी चिऊताई (चिमणी) दिवसेंदिवस कमी होत असल्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या उन्हाळ्यामुळे पक्ष्यांना पाण्याची तीव्र गरज भासत असल्याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून परिसरातील झाडांवर पाण्याची भांडी बांधली.
या उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी मातीच्या व प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये स्वच्छ पाणी भरून ते सुरक्षितपणे झाडांवर बांधण्यात आले. त्यामुळे चिमण्यांसह इतर पक्ष्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका विद्या तांबेकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी पक्ष्यांचे अस्तित्व महत्त्वाचे असून त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून समाजालाही पक्ष्यांच्या संरक्षणासाठी प्रेरणा मिळणार आहे. 🐦🌿
Users Today : 9