नियम पायदळी तुडविणाऱ्या रेणुका पेट्रोलपंप मालकावर गुन्हे दाखल जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर पाऊल; चौकशीचे आदेश, तहसील प्रशासनाची पोलिसांत तक्रार

KHOZ MASTER
2 Min Read

चिखली :
येथील जालना रोडवरील रेणुका पेट्रोल पंपावर नियमांचे सर्रास उल्लंघन करून पाण्याच्या टाक्या, रिकामे कॅन आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल व डिझेल भरून देण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित पंपमालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी Dr. Kiran Patil यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले.

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत राहावा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक आहे. कॅन, बाटली, पाण्याच्या टाक्या किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देण्यास सुरक्षा कारणास्तव बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, २६ मार्च २०२६ रोजी चिखली येथील रेणुका पेट्रोल पंपावर उघड्या टाक्या आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल व डिझेल देण्याचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ तपासणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसील प्रशासनाने कारवाई करत पुरवठा निरीक्षक रवींद्र वाघ यांनी २८ मार्च रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पंपमालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ व २८७ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कैलास चाटारकर करीत आहेत.

इंधनाची साठेबाजी करू नये – प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा पुरेसा असून नागरिकांनी विनाकारण साठेबाजी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच सर्व पेट्रोल पंप चालकांनी शासनाने ठरवून दिलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करूनच इंधन वितरण करावे, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती

दरम्यान, सोशल मीडियावर इंधन तुटवड्याबाबत अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पेट्रोल व डिझेल मिळणार नाही, या भीतीमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर रांगा कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

या कारवाईमुळे जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने नियमभंग करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

0 9 4 9 5 5
Users Today : 127
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *