हवालदार संतोष मोरे यांना शौर्य पदक बहाल
बुलढाणा –
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र आणि सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील रहिवासी हवालदार Santosh More यांनी भारतीय सैन्यदलात उल्लेखनीय शौर्य गाजविल्याबद्दल त्यांना सैन्यदलाकडून शौर्य पदक बहाल करून गौरविण्यात आले. हा सन्मान २८ मार्च २०२६ रोजी जम्मू-काश्मीरमधील Northern Command Headquarters Udhampur येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला.
Lieutenant General Pratik Sharma यांच्या हस्ते हवालदार मोरे यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. ते सध्या जम्मू-काश्मीरमधील Kupwara जिल्ह्यातील तंगधार परिसरात ३४ मराठा मैदानी तोफखाना बटालियनमध्ये कार्यरत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून ते देशरक्षणाची सेवा बजावत आहेत.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पराक्रम
दहशतवाद्यांनी केलेल्या Pahalgam येथील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबविले होते. ९ मे २०२५ च्या मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेच्या दिशेने कारवाई सुरू केली. त्या वेळी पाकिस्तानी सैन्याकडूनही जोरदार तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला.
या चकमकीदरम्यान तोफगोळ्याच्या स्प्लिंटरचा तुकडा हवालदार मोरे यांच्या उजव्या हाताला लागून ते जखमी झाले. मात्र जखमी अवस्थेतही त्यांनी हार न मानता पहाटे पाच वाजेपर्यंत शत्रूच्या दिशेने तोफगोळ्यांचा मारा सुरू ठेवत शौर्यपूर्ण लढा दिला.
हळदभरल्या अंगानेच मिशनमध्ये सहभाग
हवालदार मोरे आपल्या विवाहासाठी रजेवर गावी आले होते. लग्नाला अवघे अकरा दिवस झाले असतानाच ऑपरेशन सिंदूरसाठी तातडीने हजर होण्याचा संदेश आला. अंगावरची हळद सुकण्याआधीच त्यांनी देशसेवेसाठी कर्तव्य बजावत पुन्हा रणांगण गाठले आणि पराक्रम गाजविला.
जखमी झाल्यानंतरही त्यांनी धैर्याने लढा दिला. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
स्वातंत्र्यदिनी पदक जाहीर
हवालदार संतोष मोरे यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल १५ ऑगस्ट २०२५ रोजी Independence Day निमित्त त्यांना शौर्य पदक जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर २८ मार्च २०२६ रोजी झालेल्या समारंभात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले. या वेळी त्यांच्या पत्नी सुजाता मोरे उपस्थित होत्या.
बुलढाणा जिल्ह्याच्या सुपुत्राने गाजविलेल्या या पराक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
Users Today : 127