साखरखेर्डा :
येथील दोन्ही पेट्रोल पंपांवर गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः डिझेल उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली आहेत.
साखरखेर्डा येथे असलेल्या दोन्ही पेट्रोल पंपांवर इंधनासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी होत आहे. ट्रॅक्टर चालक आणि शेतकरी डिझेल मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. पूर्वी ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये २० लिटरपर्यंत डिझेल घेऊन जाण्याची सुविधा होती. त्यामुळे ट्रॅक्टर पंपावर आणण्याची गरज भासत नव्हती. मात्र आता कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी असल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह पेट्रोल पंपावर जावे लागत आहे.
दरम्यान, आठवड्यातून एक ते दोन वेळाच इंधनाचा टँकर उपलब्ध होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच शासकीय सुट्यांमुळे पेट्रोल व डिझेलचा पुरवठा उशिरा होत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. परिणामी साखरखेर्डा परिसरातील शेकडो ट्रॅक्टर पेट्रोल पंपांवर उभे असल्याचे चित्र आहे.
सध्या एप्रिल व मे महिन्यात शेतीची नांगरणी, रोटावेटरची कामे सुरू आहेत. मात्र डिझेल मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे थांबली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.
दरम्यान, शासनाच्या वतीने डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Users Today : 127