बुलढाणा –
सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या वाहनाला अपघात होऊन दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना रविवारी (२९ मार्च) सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास मेहकर–चिखली मार्गावरील नांद्रा धांडे फाट्याजवळ घडली.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील बागवान कुटुंबातील सुमारे २३ जण सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. रमजान महिन्यात यात्रेला जाता आले नसल्याने त्यांनी २८ मार्च रोजी सैलानीकडे जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी पाचच्या सुमारास मेहकर बायपास येथे नाश्ता करून ते पुढील प्रवासाला निघाले.
दरम्यान, महिंद्रा पिकअप (क्र. MH-13-CU-7670) हे वाहन नांद्रा धांडे फाट्याजवळ पोहोचताच चालक बुद्धभूषण दीपक वाघमारे (रा. गौडगाव, ता. लोहा, जि. नांदेड) यांना डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील वाहनाने चार पलट्या मारल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात वाहनाच्या टपावर बसलेले
- अरमान शरीफ बागवान (वय १६)
- रिहान सैदूसाब बागवान (वय १७)
या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तर खालील १५ जण गंभीर जखमी झाले –
शहाना नबीसाब बागवान (३५), शबाना शरीफ बागवान (३५), इफल शरीफ बागवान (११), अफिफा अरीफ बागवान (१३), बुशरा अरीफ बागवान (६), आलिया अनिस बागवान (२५), हाफिस रऊफ बागवान (१५), पाशामोहम्मद बागवान (७५), मैवीश नबीसाब बागवान (९), हिना अरीफ बागवान (३०), अमीर नवीसाब बागवान (१३), अनस रऊफ बागवान (१२), अबुजर सैदूसाब बागवान (१०), साहेरा पाशा बागवान (६५) आणि शरीफ पाशा बागवान (३५).
सर्व जखमी हे बागवान गल्ली, वार्ड क्रमांक १०, अहमदपूर (जि. लातूर) येथील आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पत्रकार, स्थानिक नागरिक तसेच नांद्रा धांडे आणि नागझरी येथील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, माजी आमदार डॉ. संजय रामुलकर यांनी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना सुलतान येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच माजी नगराध्यक्ष कासम गवळ यांनी मृत आणि जखमींना अहमदपूर येथे पाठविण्याची व्यवस्था केली.
🚑 या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून बागवान कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Users Today : 5