खामगाव, दि. ३० (प्रतिनिधी):
तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या माफियांचा धुमाकूळ वाढत असतानाच रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. गस्तीवर असताना वाहन थांबविण्याचा इशारा करणाऱ्या खामगावचे तहसीलदार सुनील पाटील यांच्या अंगावर टिप्पर घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रसंगावधान राखत बाजूला झाल्यामुळे तहसीलदार पाटील थोडक्यात बचावले. त्यानंतर त्यांनी धाडस दाखवत सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपी टिप्पर चालकाला पकडले.
ही थरारक घटना रविवारी (३० मार्च) सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास खामगाव-नांदुरा मार्गावरील पारखेड शिवारात घडली. अवैध रेती वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सुनील पाटील हे आपल्या खासगी वाहनाने गस्तीवर गेले होते.
दरम्यान, एमएच-बीबी-७३१४ क्रमांकाचा रेतीने भरलेला टिप्पर दिसताच त्यांनी चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहन थांबवण्याऐवजी भरधाव वेगाने टिप्पर थेट तहसीलदारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत पाटील यांनी बाजूला होत आपला जीव वाचविला.
या घटनेनंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र तहसीलदार पाटील यांनी धाडसाने त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काही अंतरापर्यंत हा पाठलाग सुरू होता. अखेर एका मुरुमाच्या ठिकाणी तहसीलदारांनी आपले वाहन आडवे लावून टिप्पर थांबवला आणि चालकाला पकडले.
या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कठोर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
तहसीलदार सुनील पाटील म्हणाले, “पारखेड शिवारात अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने मी गस्तीवर होतो. वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतरही चालकाने भरधाव वेगाने वाहन अंगावर आणत पलायनाचा प्रयत्न केला. अखेर पाठलाग करून त्याला पकडण्यात आले असून कठोर कारवाई केली जाणार आहे.
Users Today : 28